मराठी भाषिकांनो, नमस्कार !
एवढेच नव्हे तर आपण जसे पितृऋण वा मातृऋण मानतो तसेच, ज्या भाषेमुळे भावनिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक विकास झाला, त्या भाषेचेही ऋण मानायला हवे. हे मायबोलीचे ऋण फेडण्याकरता मराठी भाषिकांनी एकत्र येऊन तसे प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.
एखाद्या भाषेची आवड जर जोपासली तर त्याभाषेत नवनवीन साहित्याची भर पडत राहील, भाषेची समृध्दी वाढत राहील; जरी ती भाषा पोटापाण्याची भाषा नसली तरी तिचा क्षय होणार नाही. मराठी भाषेची आवड जोपासली जावी म्हणून ‘अक्षयभाषा’ या नफातोटाविरहित संस्थेची स्थापना २००५ साली फिनीक्स, ऍरिझोना, यु.ए.से. इथे झाली.
या संस्थेव्दारे आतापर्यंत जे उपक्रम झालेत अन् पुढे होतील, त्यांचं मुख्य उद्दीष्ट म्हणजे मराठीपासून दुरावलेल्या आबालवृध्दांमध्ये मराठीची आवड निर्माण करणे !
ही आवड निर्माण करायची कशी ?
नाटक हे माध्यम भाषेची गोडी निर्माण करण्यात, भाषेचे सौंदर्य दर्शवण्यात प्रभावी आहे असे दिसून येते. नाटकात इतर कला प्रकार म्हणजे गायन, नृत्य इत्यादी सहज सामावतात. म्हणूनच अक्षयभाषेच्या त्रैमासिक व वार्षिक कार्यक्रमांतून कालमर्यादेप्रमाणे व कलाकारांच्या वयोमर्यादेप्रमाणे वेगवेगळ्या विषयांवर नाहिका लिहून जास्तीत जास्त व्यक्तींना मराठीतून गुणदर्शन करण्याची संधी दिल्या जाते. दरवर्षी एकांकिका करण्याची प्रथा या संस्थेनी चालू केली आहे.
जागतिकीकरणाच्या लाटेत आपल्या भाषेची झीज होऊ न देता, उलट नवनवीन विचांराची देवाणघेवाण होऊन ती जास्त समृध्द व्हावी, मराठी भाषिकांची अस्मिता टिकून राहावी म्हणून ‘अक्षयभाषा’ या भौगोलिक सीमाविरहीत व्यासपीठाची निर्मिती !
मराठी जागृतीच्या या दिंडीत टाळ-चिपळ्या धरायला तुम्हीपण या असे सर्वांस आवाहन आहे.
मायबोली वर असाच लोभ असावा ही विनंती !
भाग्यश्री: अत्यंत आवश्यक असलेला हा ऊपक्रम आहे. दहा वर्षांपुर्वी जगांत बोलल्या जाणा-या भाषांमध्ये मराठी भाषा ही सातव्या क्रमांकावर होती. मात्र दिवसेंदिवस मराठी भाषिकांची संख्या रोडावतच चालली आहे, आणि ती आता दहाव्या क्रमांकावर घसरली आहे. अशाच पद्धतीने अधोगती होत राहिली तर “आमचे पुर्वज मराठी नांवाची भाषा बोलत असत” असे आपली पुढची पिढी कुठल्यातरी अन्य भाषेतुन इतरांना सांगत असेल. असो
लॉस एंजेलिसमध्ये तीन वर्षांपुर्वी मराठी शाळा सुरु केली त्यावेळी सिमि व्हॅली या शाळेचा पत्रव्यवहार हा इंग्रजी भाषेतुनच होत असे. मात्र आतां तो मराठी भाषेतुन होतो. तीन वर्षांपुर्वी केवळ दोनच व्यक्ती मराठीत इमैल्स लिहित असत, आता निदान २०-२५ तरी सहज लिहु शकतात. प्रत्येक मराठी भाषिकाने मराठीचा फॉंट घेऊन आपली मातृभाषा रोजच्या व्यवहारांत वापरली तरी आपण एक सत्कार्य केल्याचे पुण्य मिळेल. ईंग्रजीच बोलणा-या आपल्या नातवंडांना आठवड्यांतुन निदान एक तरी मराठी शब्द शिकविल्यास हळु हळु का होईना आपल्या मराठीची गोगलगाय चालायला शिकेल. असे अनेक प्रयत्न प्रत्येकाला करतां येईल. या पार्श्वभुमीवर तु सुरु केलेला हा प्रकल्प यशस्वी होवो ह्या शुभेच्छांसह,
शशिकाका
प्रिय भाग्यश्री आणि अक्षय भाषा दिंडीतले सर्व वारकरी
तुम्हा सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक.
तुमच्या वेबसाईटनं मला चांगलंच गुंगवून ठेवलं, इतका छान खजिना आहे तो. देखणी मांडणी आणि चांगला आशय!
अभिनंदन अनेक कारणांसाठी –
-पहिल्यांदा, जो हेतू बाळगून तुम्ही अक्षय भाषा हा उपक्रम सुरु केला त्यासाठी! कारण नुसतं बोलून आणि चिंता करून भाषा आणि संस्कृती याचं काही भलंबुरं होत नसतं. त्यासाठी नियोजन आणि ठोस कृती यांची आवश्यकता असते. तुम्ही ती उत्तम प्रकारे करत आहात.
-अभिवाचन, भाववाचन, नाटिका , ऐकू आनंदे या सगळ्यामुळे भाषा गोड होऊन समोर येते. भाषेचा नाद,लय, वळणं अनुभवता येतात. मुख्य म्हणजे व्यवहारात, घराबाहेर जी भाषा आता हद्दपार झालेली आहे तिच्या अस्तित्वाला प्रयोजन मिळतं.
– जरी ही संस्था ना नफा तत्वावर चालत असली तरी गुणवत्तेच्या कसोटीवर ती निव्वळ हौशी नाही ही मोठी जमेची बाजू. वेबसाईटवरच्या बहुतेक सर्व कार्यक्रमांची गुणवत्ता ही चांगल्या कसोट्यांना उतरणारी आहे.
– चांगल्या कवितांचे वाचन, स्मृतिचित्रे, बालभारतीच्या पुस्तकांसाठी दिलेली लिंक, स्मृतीभ्रंश- Dementia सारख्या विषयावरचं विवेचन या गोष्टी आवडल्या.
– आरंभशूर लोक खूप असतात. तुम्ही मात्र २००५ पासून आजपर्यंत कामामध्ये जे सातत्य राखलं आहे त्याला दाद द्यायलाच हवी. सातत्य आणि गुणवत्ता यासाठी नुसता उत्साह पुरत नाही तर त्यापलिकडच्या अनेक गोष्टी लागतात. तुमच्यातली ही उर्जा आणि प्रेरणा सतत रहावी यासाठी मनापासून शुभेच्छा.
– शेवटी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. इथे भारतात काय, किंवा तिकडे परदेशात काय- भाषा आणि संस्कृती जतन या गोष्टीला एक मर्यादित अर्थ येऊ बघतो आहे. एकत्र जमणे, सणवार – कर्मकांड पार पाडणे, मनोरंजन आणि खाणेपिणे एवढं झालं की भाषा – संस्कृती साठी काही केल्याचा आनंद पदरात पाडून घेता येतो.
तुम्ही मात्र त्यातल्या व्यापक आणि खऱ्या आनंदाकडे जाण्याचा, इतरांनाही त्यात सामील करून घेण्याचा प्रयत्न करत आहात.
पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा!
संध्या टाकसाळे