मायबोली वर असाच लोभ असावा …


मराठी भाषकांना नमस्कार !

मराठी भाषेचे वाहन वापरून विचारांची देवाणघेवाण करणे ही एक आनंदाची व अभिमानाची बाब आहे. इंग्रजी भाषेच्या वर्चस्वामुळे अनेकभाषा मागे सरल्या, समूळ   नष्ट झाल्या असे ऐकिवात येते. मराठी भाषेचा -हासपण अपरिहार्य आहे किंवा मराठीत आलेले इंग्रजी शब्द ही भाषेची श्रीमंती होय असा सोयीस्कर गैरसमज कित्येकांनी करून घेतला आहे. इंग्रजी अतिक्रमणाचा कळत नकळत झालेला स्वीकार प्रस्थापित लेखकांच्या कलाकृतींमधून डोकावू लागला आहे याचे वैषम्य वाटते. आपली भाषा जास्तीत जास्त शुद्ध अवस्थेत पुढच्या पिढीपर्यंत पोचवणे हे प्रत्येक सुसंस्कृत समाजाचे कर्तव्य होय. जागतिकीकरणामुळे सर्वत्र वेगवेगळ्या संस्कृतींचे सपाटीकरण होते आहे असे दिसून येते; जर आपली भाषा टिकवली तर संस्कृतीचे वेगळेपण सुद्धा टिकून राहील हे सूज्ञास सांगणे नलगे.

एवढेच नव्हे तर आपण जसे पितृऋण वा मातृऋण मानतो तसेच, ज्या भाषेमुळे भावनिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक विकास झाला, त्या भाषेचेही ऋण मानायला हवे. हे मायबोलीचे ऋण फेडण्याकरता मराठी भाषिकांनी एकत्र येऊन तसे प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. एखाद्या भाषेची आवड जर जोपासली तर त्याभाषेत नवनवीन साहित्याची भर पडत राहील, भाषेची समृध्दी वाढत राहील; जरी ती भाषा उदर-निर्वाहाची भाषा नसली तरी तिचा क्षय होणार नाही. मराठी भाषेची आवड जोपासली जावी म्हणून ‘अक्षयभाषा’ या विनानफा संस्थेची स्थापना २००५ साली फिनिक्स, ऍरिझोना, यु. एस. ए. येथे झाली.                  या संस्थेव्दारे आतापर्यंत जे उपक्रम झालेत अन् पुढे होतील, त्यांचं मुख्य उद्दीष्ट म्हणजे मराठीपासून दुरावलेल्या आबालवृध्दांमध्ये मराठीची आवड निर्माण करणे !

ही आवड निर्माण करायची कशी ?            नाटक हे माध्यम भाषेची गोडी निर्माण करण्यात, भाषेचे सौंदर्य दर्शवण्यात प्रभावी आहे असे दिसून येते. नाटकात इतर कला प्रकार म्हणजे गायन, नृत्य इत्यादी सहज सामावतात. म्हणूनच अक्षयभाषेच्या त्रैमासिक व वार्षिक कार्यक्रमांतून कालमर्यादेप्रमाणे व कलाकारांच्या वयोमर्यादेप्रमाणे वेगवेगळ्या विषयांवर नाटिका लिहून जास्तीत जास्त व्यक्तींना मराठीतून गुणदर्शन करण्याची संधी दिल्या जाते. दरवर्षी एकांकिका करण्याची प्रथा या संस्थेनी चालू केली आहे.                            जागतिकीकरणाच्या लाटेत आपल्या भाषेची झीज होऊ न देता, उलट नवनवीन विचांराची देवाणघेवाण होऊन ती जास्त समृध्द व्हावी, मराठी भाषिकांची अस्मिता टिकून राहावी म्हणून ‘अक्षयभाषा’ या भौगोलिक सीमाविरहीत व्यासपीठाची निर्मिती !                            मराठी जागृतीच्या या दिंडीत टाळ-चिपळ्या धरायला तुम्हीपण या असे सर्वांस आवाहन आहे. मायबोली वर असाच लोभ असावा ही विनंती !

अक्षयभाषेचे काही उल्लेखनीय उपक्रम-

ऐकू आनंदे-

अक्षयभाषा शीर्षक गीत – कवयित्री- भाग्यश्री बारलिंगे, गायक – मुग्धा लिमये, पार्थ पराडकर.