रंग कार्यक्रम मार्च ३०, २०१९ शनिवार (Rang Program)

रंग
मंडळी, 
फिनिक्सची हवा दिवसेंदिवस बहारदार होते आहे. चैत्र महिना जवळ येत चालला आहे. दुर्गा बाईंनी त्यांच्या ऋतुचक्र या पुस्तकांत लिहिले आहे की ‘चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे. ऋतुराज वसंताचे स्पंदन पावणारे हृदय आहे, यात शंका नाही.’ फिनिक्समध्ये सुद्धा निसर्ग लवकरच रंगांची उधळण सुरू करेल. अश्या वेळी आपणही या रंगोत्सवात सामील होऊ या. 
अक्षयभाषेतर्फे “रंग” या विषयावर आधारित कार्यक्रम योजिला आहे. 
दिनांक – मार्च ३०, २०१९ शनिवार, 
वेळ – दुपारी १:३० ते ३:३०, 
स्थळ -Chandler Downtown Public Library, 22 South Delaware street, Chandler. 
या तर मग आपल्या कविता, मनोगते, आवडते उतारे, लघुकथा घेऊन ! दोन अटी – साहित्य मराठीत हवं (भाषांतरित चालेल) आणि रंग या विषयाला धरून हवं. 
आपल्या येण्याचा मानस (RSVP) लवकरात लवकर info@akshaybhasha.org येथे कळवावा. तसेच काही सूचना, प्रश्न असल्यास जरूर कळवावे. 
विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांना खास आमंत्रण – कलाकार म्हणून, प्रेक्षक म्हणून ! 
लहान मुलांनी या कार्यक्रमासाठी बरेच कष्ट घेतले आहेत. त्यांना उत्तेजन देण्यासाठी या.
स्नेहांकित , 
भाग्यश्री बारलिंगे

A welcome speech by Deepali Kulkarni
The star of the program- Mihir Lele reciting a poem
written by Bhagyashree Barlingay

अबबबबबबब…केवढे रंग आकाशी;
रोज सकाळी संध्याकाळी
रंगपंचमी खाशी !
अबबबबबबब…फुलांचा रंग पसारा;
नाचणार्या मोराचा, पाहिलात कां
रंग पिसारा ?
अबबबबबबब…केवढे रंग हे आई!
लाल निळा मोजता मोजता
दिवस संपून जाईल.
अबबबबबबब….केवढे रंग हे आई!

Sanika Deshmukh reciting a poem
written by Bhagyashree Barlingay

पेरले मी बी काळे…लेखिका : भाग्यश्री बारलिंगे, मेसा, ॲरिझोना ©

पेरले मी काळ्या मातीत
एक छोटेसे बी काळे
येतील त्याला मला वाटले
पाने काळी अन् काळीच फुले !
निळ्या आकाशाखाली गाढ
किती दिवस ते झोपले;
पिवळा सुर्यकिरणांचा रस
असेल कां ते प्याले?
कुठल्या रंगाचे पाणी
मी त्याला घातले?
एक दिवस पाहते तर काय -दोन पिटुकली हिरवी पाने !
हातच जणु जोडलेले
काळ्या मातीतून वरती
हळूहळू येऊ लागले.
त्याचे झाले छानसे
रोपटे वार्यात डोलणारे
काळ्या बीचे काळ्या मातीत
काय झाले कोण जाणे?
पुढे लागली त्याला
सुंदर लाल पिवळी फुले;
आणि गोजिरवाणी
जांभळी फळे!
हिरवा, लाल, पिवळा, जांभळा
कळला मला निसर्गाचा ढंग,
काळ्या रंगात दडलेय् बाकीचे सर्व रंगं !
-भाग्यश्री बारलिंगे

Ira Shilimkar presenting a natychhata ( one person act)
written by Bhagyashree Barlingay

Share the crayons !

लेखिका : भाग्यश्री बारलिंगे, मेसा, ॲरिझोना ©

मला माझे क्रेयॉन्स खूप आवडतात. माझी आई म्हणते तू जन्माला आलास ते क्रेयॉन्स घेऊनच. मला असं वाटतं खू ssप मोठ्ठा कागद मिळावा चित्र काढायला… जशी आमच्या किचनची भिंत आहे ना तितका मोठ्ठा ! पण आई खूप रागावते तिथे मी एक जरी…अगदी एव्हढीशीपण … रंगीत रेष काढली तर. मला काही कळत नाही…  एकदा ती कुणाला तरी सांगत होती ‘अगं, सावरकरांनी भिंतीवर लिहिलं’. कोण हे सावरकर? त्यांची आई त्यांना कशी रागावली नाही. दुसरं म्हणजे सारखं सगळेजण सांगतात ‘share the crayons, share the crayons’. मला नाही करायचे share माझे क्रेयॉन्स ! मी खूप क्रेयॉन्स जमवणार…खूपss …खिडकीतून तो camelback mountain दिसतो ना तितके… असं मी लहान असताना म्हणायचो पण मी या वर्षी शाळेत जायला लागलो. मोठा झालोय ना मी ! एकदा काय झालं … शाळेत टिचरने इंद्रधनुष्य काढायला सांगितलं. मला वाटलं मी एकटाच ते पूर्ण चित्र काढेन. माझ्या जवळ सगळे रंग आहेत. पण सेरा जवळ जांभळ्या रंगाची शेड होती आणि ताहीर जवळ हिरव्या रंगाची, मायकल जवळ केशरी रंगाची तर गोविंद जवळ निळ्या रंगाची…टीचरने सांगितलं की प्रत्येक जण इंद्रधनुष्याचा एक रंग काढणार. खूप मज्जा आली. आणि कागद भिंतीवर चिकटवला होता … खूप मोठा … आम्हां सगळ्यांना मिळून जर चित्र काढायचं असलं तर कागद मोठाच लागेल की नाही ? माझा छोटा भाऊ आहे नं तो अलीकडेच आमच्याकडे रहायला आलाय. तो काही क्रेयॉन्स घेऊन जन्मला असं वाटत नाही मला कारण त्याच्या मुठी बंदच असतात. कदाचित त्याच्या बंद मुठीत अगदी बारके क्रेयॉन्स असतील त्याच्या सारखेच आणि ते पण त्याच्या बरोबर मोठे होतील. मी त्याचा मोठा दादा आहे. मी त्याला सांगेन सगळ्यां बरोबर क्रेयॉन्स share कर म्हणून. त्यातच खरी गम्मत आहे.

             —–समाप्त—–

Shlok Rangancha- written and presented by
Omkar Karhade with his daughter Reva

रंग कविता / श्लोक – लहान मुलांसाठी

© Omkar Karhade

रंग माझा आवडीचा आज हिरवागार हो

गवत हिरवे पान हिरवे शेत हिरवेगार हो

रंग माझा आवडीचा आज लालेलाल हो

लाल कुंकू लाल रक्त दूर मंगळ लाल हो

रंग माझा आवडीचा पांढरा तो शुभ्र हो

पांढरे हे दात माझे पांढरे ते दूध हो

रंग मजला आवडे आता निळा रंगीत हो

सागरा पाणी निळे वरती निळे आकाश हो

रंग माझा आवडीचा आज पिवळा जर्द हो

केळ पिवळे ऊन पिवळे हळद पिवळी जर्द हो

रंग माझा आवडीचा आज काळा कुट्ट हो

केस काळे म्हैस काळी रात्र काळी कुट्ट हो  

Omkar Karhade reciting his own Gazal

रंगुनी रंगात साऱ्या – अमेरिकेतल्या मराठी माणसाची गझल

© Omkar Karhade

रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा

इकडचे गोरे नि काळे रंग माझा सावळा

पश्चिमेचा वेष यांचा पश्चिमी भाषा तशी

चालण्या अन बोलण्याचा ढंग माझा बावळा

बाह्यरंगी सरळ साधी चाकरी अन भाकरी

अंतरंगी पाहता मज अंतरी नाना कळा

आपले मी मानिले हो ख्रिसमसालाही इथे

आणि हॅलोवीनसाठी आणिला मी भोपळा

हरितरंगी कार्ड येण्या लागली वर्षे जरी

लाभल्या दिवसात माझा मांडतो मी सोहळा

-ॐ


Jayanti Deshmukh singing Pasaydan
A funny skit by Omkar Karhade,
Artists- Reva & Namita Karhade

छोट्या रंगीत पेन्सिलीची गोष्ट © Omkar Karhade कलाकार: नमिता घाटे, रेवा कऱ्हाडे; लेखक: ओंकार कऱ्हाडे 


मोठी हिरवी पेन्सिल (आई): हिरुली, चला पटापट तयार व्हा.. आज शाळेचा पहिला दिवस ना.. डबा, बाटली घेतली का? बस येईलच इतक्यात.. आणि हो, घाबरू नको बरं का… तिथे तुला खूप मित्र मैत्रिणी भेटतील .. मज्जा कर बरं का.. 

छोटी हिरवी पेन्सिल (हिरुली): हो आई, मला खूप मज्जा वाटतेय.. नवीन दप्तर .. नवीन डबा .. नवीन शाळा.. 
आई: आणि हो, नीट अभ्यास करायचा.. बाई म्हणतील ते ऐकायचे.. 
हिरुली: हो आई, नवीन अभ्यास.. नवीन बाई.. नवीन बस.. पण जुनीच आई .. ही ही ही.. 
आई: चल डांबिस कुठली.. बाय.. 
हिरुली: मी आहे छान छान हिरव्या रंगाची पेन्सिल .. अजून मी आहे छोटीशी .. त्यामुळे मी चित्र काढते तेव्हा तेवढी नीट येत नाहीत.. मी तरी जपून जपून कडेकडेने जाते पण मधेच थोडीशी बाहेर जाते रेघेच्या.. मग खोडत बसते.. मग आई म्हणते खोडकर मुलगी आहे नुसती..
मी मोठी झाले ना की आईसारखी बनणार आहे.. उंच , सुंदर, टोकदार आणि हिरवीगार .. अशी नुसती इकडून तिकडे गेले तरी छान चित्र बनेल.. चला माझी शाळा आली. . हरित कला मंदिर.. बाय.. आपण भेटू शाळेनंतर.. 
(हिरुली दुःखी चेहरा करून येते.. )
आई: अगं काय झाले? कुणी रागावले का तुला ? का धडपडलीस पुन्हा? पुन्हा टोक मोडले की काय ? अरे देवा.. तरी मी सांगत होते.. फार धसमुसळेपणा नको करू म्हणून.. अशी टोक करत राहिलीस तर कशी उंच होणार.. 
हिरुली: (प्रेक्षकांना) आई अशी बोलायला लागली की बाबा म्हणतो.. ती फार टोकाची भूमिका घेते.. मला ते फार मजेशीर वाटते कारण माझ्या एका मैत्रिणीचे नाव भूमिका आहे.. 
(आईकडे बघून) नाही ग आई. तसं काही नाही. पण सगळे मला चिडवत होते.. सगळ्यांनी गवत काढले छान छान हिरवेगार.. तू काढतेस तितके छान नाही पण छान हिरवे.. आणि मी काढले तर सगळे म्हणे हे तर वाळून गेलेय.. 
सगळ्यांनी झाडे काढली छान छान हिरवीगार… तुझ्याइतकी छान नाही… पण छान हिरवी.. आणि मी काढली तर सगळे म्हणे फॉल आलेला दिसतोय.. 
मला नाही जायचे शाळेत.. 
आई: असं झालंय का माझ्या बाळाला .. इकडे ये.. बघू बरं मला.. गवत काढून दाखव.. 
(छोटी इकडे तिकडे पळून गवत काढते.. )
आई: अरेच्चा, खरंच की.. 
(हिरुली.. दु:खी होऊन आवाज काढते.. उं ..)
आई: बरं , आता झाडं काढून दाखव.. 
(हिरुली इकडे तिकडे पळून झाडं काढते.. )
आई: आता मी तुला एक गम्मत दाखवू का? हे बघ आता मी गवत काढते.. 
(हातवारे करते)
हिरुली: वा.. किती छान.. नाहीतर माझे बघ.. 
आई: हिरुली, आता इथे एक छान फूल काढ बरं .. 
(हिरुली फूल काढते.. )
आई: आता इथे एक छान सूर्य काढ बरं … 
(हिरुली सूर्य काढते)
आई: आता बघ.. 
हिरुली: अहा … किती छान..  
आई: तू मोठी झाल्यावर बनशील .. छान, उंच, टोकदार, पण हिरवीगार नाही पिवळीधम्मक … ?
हिरुली: हो.. पण कसं ?
आई: का नाही.. रेषा तशाच काढायच्या दिमाखात.. रंग असाच भरायचा रेषेच्या आत… फक्त जिथे आपला रंग खुलून येईल तिथे.. उद्यापासून आपण तुला पाठवूया पीत कला मंदिरात.. 
(हिरुली उड्या मारते)

Shreya Deshpande singing a song of the Spring season
Viha Mohnalkar reciting a poem written by Vinda Karandikar
Asmita & Sandeep reciting a poem written by Balkavi
A natyachhata ( one person act)
performed by Rujul Dalvi written by Bhagyashree Barlingay

                              रंगछटा 

          लेखिका: भाग्यश्री बारलिंगे,मेसा,ॲरिझोना ©

मला रंग अतिशय आवडतात. माझ्याकडे बघून तुम्हाला ते कळलंच असेल. माझा हे गुलाबी फ्रेमचे निळे गॉगल्स, हा माझा पिवळा स्कार्फ आणि रंगीबेरंगी ड्रेस. आणि मला मराठी बोलायला खूप आवडतं कारण मग मी मोट्ठी झालेय असं मला वाटतं. पण मला रंगांच्या शेड्स म्हणजे…काय बरं म्हणतात शेड्सना…छटा ..त्यांची नावं काही नीट येत नाहीत. एकदा काय झालं की आम्ही सगळे चाललो होतो स्प्रिंगब्रेक मध्ये कॅलिफोर्नियाला. मी आणि दादा मागे बसलो होतो ,बाबा ड्राईव्ह करत होते आणि आई पॅसेंजर सीट मध्ये बसली होती. मला आईबरोबर पुढे बसायला इतकं आवडलं असतं ना पण ह्या दादा बरोबर बसावं लागलं. तो काही बोलत नाही. सारखा आपला व्हिडिओ गेमच खेळत राहतो. मी खिडकीतून बाहेर पहात होते. मी आईला सांगितलं की आपण एक नदी क्रॉस करतो आहोत.

आई म्हणाली,” किती छान, पांढरी शुभ्र !” बाबा म्हणाले, ‘छे, किती मळकी!’ दादा म्हणाला,( तो नेहमी बाबा जे बोलतो ना तेच बोलतो) ‘डर्टी , टाईडनं वॉश केली पाहिजे.’  मी माझे गुलाबी फ्रेमचे निळे गॉगल्स लावले. मी म्हणाले, ‘नदी निळी शुभ्र दिसते.’ आई म्हणाली ‘पांढरा शुभ्र असतो; निळा भोर असतो .’ (दादा इकडे हसून हसून निळा भोर झालेला !) पुढे लागला एक फार्म. दादा म्हणाला, ‘बाबा, बघा द्राक्षांचा गार्डन.’ आई म्हणाली, ‘द्राक्षांचा मळा.’ (मी काही हसून निळेभोर झाल्ये नाही हं तेव्हां !)

माझे गुलाबी फ्रेमचे निळे गॉगल्स काढून मी बघितलं. मी म्हणाले, ‘हिरव्याभोर प्लॅन्ट्सवर, हिरवी भोर द्राक्षं.’ आई म्हणाली,’ निळा भोर असतो, हिरवा मात्र कंच असतो.’ (दादा मात्र हसून हसून निळाकांच … आपलं.. निळा बोर झालेला. ) मग मी दादाला चांगलं पिंच केलं. त्याचं स्किन झालं लाल कांच SSS बोS र SSS सुब्र .. 

बाबा म्हणाले,’ पुरे आता.’ दादाने त्याचा नवीन व्हिडिओ गेम काढला . 

माझे गुलाबी फ्रेमचे निळे गॉगल्स घातले. अन माझ्या पांढऱ्या सुब्र मैत्रिणीला टेक्स्ट केलं, 

‘ Let us start a color box company with such colors as white subra, blue bor, green kaanch ….’

   _______________The END_______________

A natyachhata ( one person act)
performed by Shashank Dalvi written by Bhagyashree Barlingay

                     किरमिजी रंगाचा पाऊस … 

       लेखिका भाग्यश्री बारलिंगे, मेसा अॅरिझोना ©

रंग शब्द म्हटला की माझ्या डोक्यात नुसता गोंधळ होतो. नाही म्हणजे मी काही अगदीच असा ‘हा ‘ नाही. मला आपले साधे रंग कळतात – लाल, काळा, पिवळा, निळा. पण किरमिजी म्हणजे काय? तुम्ही म्हणाल त्यात काय एव्हढं ? google कर. पण त्याचं काय झालं की मी जेवत होतो आणि आई फोनवर तिच्या मैत्रिणीला सांगत होती की ‘ असं वाटतंय की किरमिजी रंगाचा धुंद पाऊस येतोय … ‘ तेव्हां खरंच पाऊस येत होता. मी दचकून बाहेर पाहिलं की खरंच रंगीबेरंगी पाऊस तर येत नाहीये ना. खाऊ की google करू असं झालं आणि नंतर मी विसरलो. आई म्हणाली टॉमीला बाहेर फिरवून आण; तेव्हां मला ते आठवलं. तर मी म्हटलं ‘ किरमिजी रंगाचा पाऊस आल्यामुळे किरमिजी रंगाचा चिखल झालाय. त्यामुळे आज टॉमीला फिरायला नेत नाही.’ तर आई कित्ती हसली … अगदी चेहरा लाल होत पर्यंत ! शेवटी मला इतकं लाजल्यासारखं झालं की माझा चेहरा पण लाजून लाल झालाय असं माझी धाकटी बहीण, अरु म्हणाली. ती वाटच पहात असते म्हणा असं काहीतरी होईल याची. त्यादिवशी पाऊस आल्यामुळे cleaners आले नाहीत. तर बाबा म्हणाले यांचे रंग काही ठीक दिसत नाहीत. मी बाबांना म्हणालो असं इंग्लिश मध्ये म्हणू नका म्हणजे झालं. बाबा costco त चालले होते. मला पण जायचं होतं. आई म्हणाली कपडे बदल. खरं म्हणजे घातले ते अगदी छान होते. पण आई म्हणाली मळके आहेत. मला विचारावेस वाटलं की म्हणजेच किरमिजी कां ग ? पण तशी हिम्मत केली नाही अरु तिथेच उभी असल्यामुळे ! आई म्हणाली आकाशी रंगाचा शर्ट घाल. बाहेर जाऊन पाहिलं तर आकाशात काळे … राखडी रंगाचे ढग होते. माझ्याजवळ तश्या रंगाचा शर्ट सापडेना. पश्चिमेला मात्र लाल रंग होता. तेव्हां मी भारतातून आणलेला लाल झब्बा घातला… झालं तेव्हढं कारण पुरलं सगळ्यांना… मला आठवडाभर चिडवायला. मला कळतंच नाही हे रंग कुठल्या कलर बॉक्स मध्ये असतात ते… किरमिजी, मळका, आकाशी, न येण्याचा रंग.. मी शेवटी असं ठरवलं आहे की फक्त काळा अन पांढरा हे दोन दयाळू रंगच काय ते मला या गोंधळातून वाचवू शकतील. म्हणून मी फक्त काळे आणि पांढरेच कपडे घालणार आहे, पण त्यामुळे मी गोत्यात यायचं थांबीन असं नाही. कालच माझ्या टिचरचे म्हणजे मिस जॉन्सनचे केस अचानक सोनेरी झालेले दिसले. मला वाटलं आजारी पडली की काय? मी तिला केसांकडे बोट दाखवून विचारलं, What happened, Miss Johnson ? तर ती हसत म्हणाली,’ It rained gold yesterday.’ E mily Smith ने तेव्हढ्यात मला एक weird look दिला. आता यांचेही चेहरे हसून लाल होतील हे जाणून मी बाहेर खेळायला पळालो. पण मला Miss Johnson ला सांगायचं होतं की काल किरमिजी रंगाचा पाऊस पडला म्हणून …

Stand up comedy- a new, fresh addition
written & performed by Shilpa Upadhye
Apoorva Mohnalkar presenting her own write up
Sunita Deshpande reciting a poem written by Bha. Ra. Tambe
Asmita & Aparna playing Devyani and Sharmishtha respectively in a skit written by Bhagyashree Barlingay
Geeta Joshi reading an article
Mr Deokar reading his article on Rang- his perspective.