2020
‘वाचवणारे वाचन’
मंडळी,
‘करोना’मुळे मनावर मरगळ आलेली आहे; आपल्यावर कुठल्याही क्षणी ही आपत्ती कोसळेल अशी कुशंका मनाला छळते आहे. अशा दारुण परिस्थितीत कंटाळ्याला बळी न पडता, सामाजिक अंतर राखण्याच्या सोवळ्याचे पालन करून आपण एकमेकांची मने नक्कीच उत्फुल्ल ठेवू शकतो. पुस्तके अशा वेळी मदतीला येतात. तुमच्या स्वत:च्या किंवा तुमच्या आवडत्या कविता, नाटकातले संवाद, पुस्तकातील उतारे वाचून त्याचं रेकाॅर्डिंग (maximum 5 min long) info@akshaybhasha.org इथे इमेल करा. ते योग्य असल्यास अक्षयभाषा वेबसाईटवर post केल्या जाईल.
धन्यवाद! तुम्ही सर्व या अदृश्य शत्रूपासून स्वत:चा यशस्वीपणे बचाव कराल, या शुभेच्छा !
अक्षयभाषेतर्फे जाहीर केलेले सर्व सामाजिक कार्यक्रम अर्थातच रद्द केले आहेत.
स्नेहांकित,
भाग्यश्री बारलिंगे
अध्यक्षा
अक्षयभाषा
2016
Bal Kavita बाल कविता
अ ब ब ब ब ब … – कवी वसंत बापट, वाचन- भाग्यश्री बारलिंगे
देवा, तुझे किती l सुंदर आकाश
सुंदर प्रकाश l सूर्य देतो
सुंदर चांदण्या l चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर l पडे त्याचॆं
सुंदर ही झाडे l सुंदर पाखरें
किती गोड बरें l गाणें गाती
सुंदर वेलींचीं l सुंदर ही फुलें
तशी आम्ही मुलें l देवा , तुझीं
इतुके सुंदर l जग तुझे जर
किती तूं सुंदर l असशील !
पोपट अन् मासा -कवयित्री/ वाचक -भाग्यश्री बारलिंगे
एकदा एका पोपटाची अन् माशाची मैत्री झाली. दोघं खूप गप्पा मारायचे …पण दुरून दुरून !
एकदा पोपट म्हणाला माशाला ….
माझं घर झाडात, तुझं घर आडात
माझं घर झाडात, तुझं घर आडात ll धृ ll
माझ्या घरी ये मित्रा, sleep over ला
फळे खायला, मजा करायला
फांद्यांवरती झोके घ्यायला
असं पोपट म्हणाला माशाला ll १ll
मासा ऐकत होता,
पोपट पुढे म्हणाला …
अहाहा … धुंद , धुंद वाऱ्याच्या झुळका
कधीतरी तू प्यायलास कां ?
पानातून लुकलुक तारका
कधी तरी तू पाहिल्यास कां ? ll २ll
माझ्या घरी ये झटकन कसा
गाणी म्हणू, मोकळा करू घसा
मित्रा, bunk bed तयार आहे sleep over ला
तू वरच्या फांदीवर, no problem मला खाली झोपायला
असं पोपट म्हणाला माशाला ll ३ll
तेव्हां मासा खूप हसला…. हो हो… हा हा …. ही ही …
इतका हसला की त्याच्या नाका तोंडात पाणी गेलं अन् तो बुडायला लागला.
पण मासाच तो! पटकन वरती आला अन् पाण्या बाहेर नाक काढून पोपटाला म्हणाला ….
माझं घर आडात, तुझं घर झाडात
माझं घर आडात, तुझं घर झाडात ll
मित्रा, तूच ये माझ्या घरी sleep over ला
सूळ सूळ पोहायला, मजा करायला
थेट तळाशी सूर मारायला
असं मासा म्हणाला पोपटाला ll ४ll
पोपट ऐकत होता,
मासा पुढे म्हणाला …
अहाहा …शेवाळाची मखमली गादी
कधी तू त्यावर नाचालायसं कां ?
लहान मोठ्या दगड कपारी ,
त्यात कधी तू लपलायसं कां ?
झटकन ये माझ्या घरी ,
खाऊ आपण plankton करी
पोहता पोहता झोपायला
अन् झोपता झोपता पोहायला
खूप मजा येईल आपल्याला
असं मासा म्हणाला पोपटाला ll ५ll
तेव्हा पोपट पंखांनी आपले पोट धरून खूप हसला …. हो हो… हा हा …. ही ही …
इतका हसला की फांदीवरून खाली पडायला लागला.
पण पोपटचं तो ! झटकन फांदीवर उडून आला अन् म्हणाला …
असू दे मित्रा, तू रहा आडात, मी राहतो झाडात !
मासा म्हणाला, अगदी कबूल .
तू रहा झाडात, मी राहतो आडात … !
गप्पा करू, निळ्या आकाशाखाली
तू घे झोके फांदीवर,
मी घेईन जल लहरींवर.
तुझी माझी मैत्री रंगेल, निळ्या आकाशाखाली….
जरी तू राहशील झाडात आणि मी आडात !
घर -कवयित्री/ वाचक- शिल्पा उपाध्ये
“माझं घर इंटरनेटवरचं”
माझं घर बांधेन मी
इंटरनेटच्या जाळ्यावरती
कीज आणि माउसच्या
बांधू त्याला भिंती
कोणीही यावं -हिरवळीत बागडावं
केशरी उन्हात आरामात पहुडावं.
या virtual घराला नाही लागणार लोन
आहे नं तुमच्याकडे एक स्मार्ट-फोन?
“माझं घर – झाडावरचं”
माझं घर बांधेन मी उंच झाडावरती
मुळ्ळीच नको मला काँक्रिटच्या उंच इमारती!
वाराही येईल, पाऊसही येईल,
ऊनही येईल, आणि चांदणंही येईल!
कोळ्याच्या जाळ्यांना
पक्ष्यांच्या घरट्यांना आणि
मुंगीच्या वारूळालाही
हे घर ठेवून घेईल.
अशा या घरात मला राहायला आवडेल
‘पसारा’ आवरण्याची भानगडच नसेल!
“माझं घर – पाण्याखालचं”
माझं घर बांधेन मी उंच पाण्याखालती
मुळ्ळीच नको मला दगड विटा माती!
हलकं-फुलकं हे घर वार्यावर हलेल,
लाटांच्या बरोबर मग झोपाळा झुलेल.
मासोळ्या सुळ्कतील देवमासे झुलतील
जलपर्या माझ्याबरोबर खेळायलापण येतील!
अशा या घरात मला राहायला आवडेल
शाळा ‘बुडण्याची’ मग भानगडच नसेल!
“माझं घर – चंद्रावरचं”
माझं घर बांधेन मी शुभ्र चंद्रावरती,
मुळी कंटाळाच आला मला या पॄथ्वीवरती
इकडून तिकडं हे घर तरंगेल,
कंटाळा नाहीच येणार इतकं हे फिरवेल.
फुल्-मून मग रोजच दिसेल,
अमावस्येच्या अंधाराची भीतीच नसेल.
अशा या घरात मला राहायला आवडेल
सांडण्या-बिंडण्याची काही भानगडच नसेल
Kavita ..rutunchya कविता …ऋतूंच्या
ऊन हिवाळ्यातिल शिरशिरतां मृद् गंध)-कवी विंदा करंदीकर, वाचन- भाग्यश्री बारलिंगे
ही हवा (निराकार) -कवी इंदिरा संत, वाचन- भाग्यश्री बारलिंगे
उशिराचा पाऊस (दशपदी)-कवी अनिल, वाचन- भाग्यश्री बारलिंगे
एकट्या दुकट्या मेघानं … सादरकर्ती राधा बगे, कवयित्री -भाग्यश्री बारलिंगे
मैत्र – कवी /सादरकर्ती शिल्पा उपाध्ये